Politics

पंकजाताई, रोहित पवारांना हात जोडून म्हणाल्या, ‘तुम्ही माझ्या घरातल्या सगळ्या व्यक्तींना नका हो फोडू’

मुंबई – गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आणि भाजप नेत्या पंकजाताई मुंडे या शरद पवार यांचे नातू आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना हात जोडून मिस्किलपणे म्हणाल्या, ‘तुम्ही माझ्या घरातल्या सगळ्या व्यक्तींना नका हो फोडू’

पंकजा मुंडे या रोहित पवार यांना असं का म्हणाल्या असतील, याचं कारण म्हणजे ‘चला हवा येऊ द्या’च्या थुकरटवाडीत यंदा राजकीय वारे वाहणार आहेत. कारण ‘चला हवा येऊ द्या’मध्ये भाजपा नेत्या पंकजा मुंडे आणि त्यांचे पती अमित पालवे, राष्ट्रवादीचे आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार आणि भाजपा खासदार सुजय विखे आणि त्यांच्या पत्नी धनश्री यांनी हजेरी लावली आहे.

राजकीय मैदानात दोन दिग्गज कुटुंबांचा दबदबा असलेले मुंडे व पवार एकाच मंचावर पाहायला मिळणार आहेत. अशावेळी थट्टामस्करीतूनही राजकीय फटाकेबाजी पुढच्या भागात पाहायला मिळणार आहे. कार्यक्रमात सहभागी झालेल्या जोडप्यांमध्ये एक खेळ खेळण्यात आला. रिंग टाकून वस्तू जिंकण्याचा हा खेळ होता आणि त्या वस्तूंमध्ये घडाळ्याचाही समावेश होता.

योगायोगाने धनश्री आणि अमित यांनी रिंग टाकली आणि नेमकी ती घडाळ्यावर पडली. त्यानंतर “तुम्ही माझ्या घरातल्या सगळ्या व्यक्तींना नका हो फोडू”, असा टोला पंकजा मुंडेंनी रोहित पवारांना लगावला.“सुजय यांची बायको आणि माझा नवरा यांना फोडण्याचं काम रोहित करत आहेत”, असा मिश्किल टोमणा पंकजांनी मारताच रोहित पवारांनीही त्याला मजेशीर प्रत्युत्तर दिलं. घरच्यांना माहित असतं आपल्या माणसांसाठी काय चांगलं आहे”, असं रोहित म्हणताच सेटवर एकच हशा पिकला.


ही राजकीय धुळवड लवकरच झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात रसिकांना अनुभवता येणार आहे.हा कार्यक्रम येत्या सोमवारी आणि मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता प्रसारीत होणार असून, तो पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक झाले आहेत.

ही बातमी लगेच शेअर करा ...
error: Content is protected !!