Politics

तर फेकूचंद पडळकरांना त्यांच्या ढोलासह तुरुंगात टाकले असतं -शिवसेना

मुंबई – सरकारच्या दडपशाहीच्या विरोधात सोमवारी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधान भवनाजवळ अनोख्या पद्धतीने आंदोलन करत राज्य सरकारचा कडाडून निषेध नोंदवला होता. आ. पडळकर ढोल बडवत विधानभवन परिसरात दाखल झाले होते. यावेळी पडळकर मागण्यांचा एक भलामोठा फलक घेऊन आले होते.

आमदार पडळकरांच्या या हटके आंदोलनावर शिवसेनेनं सामनामधून निशाणा साधला आहे. ‘विधिमंडळांचे अधिवेशन सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी फेकूचंद पडळकरांसारखे नेते विधानसभेच्या दारात पारंपरिक ढोल वाजवून सरकारविरोधात नाचगाणे, घोषणाबाजी करीत होते. त्या ढोलवादनाचे थेट प्रसारण सर्व वृत्तवाहिन्या दाखवीत होत्या.

हुकूमशाही किंवा आणीबाणीसारखी परिस्थिती असती तर फेकूचंद पडळकरांना त्यांच्या ढोलासह तुरुंगात टाकले असते, पण फेकूचंदना लोकशाही मार्गाने ढोल वाजवून निषेध करण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळावे, अशी फेकूचंद यांची मागणी होती. धनगर आरक्षण, मराठा आरक्षण हे संवेदनशील विषय आहेत. कुणावरही अन्याय न होता आरक्षण मिळावे, ही शासनाची भूमिका आहेच, असे सामनाच्या आजच्या अग्रलेखात म्हटले आहे.

ज्यांना महाराष्ट्रातील कथित आणीबाणीचा त्रास होतोय त्यांना देशातील एकांगी कारभार व हुकूमशाही प्रवृत्तीची भीती वाटत नाही. अठरा दिवसांपासून पंजाब-हरयाणाचा शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करतोय. त्यांच्यावर पाण्याचे फवारे मारणे, अश्रुधूर सोडणे यास आणीबाणीचा कोणता प्रकार मानायचा? महाराष्ट्रात आणीबाणी आहे की नाही हे जनता ठरवेल, पण दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेल्या दडपशाहीचे काय? त्या आणीबाणीवर बोला ! असेही सामना अग्रलेखात आहे.

ही बातमी लगेच शेअर करा ...
error: Content is protected !!