Politics

अजितदादा, जयंतराव “तुम्ही दगडावर कितीही डोकं आपटलं तरी” – मुनगंटीवर

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनेकदा सांगतात की भाजपाचे २० ते २५ आमदार आमच्या संपर्कात आहेत. तुमच्या सरकारला आता सत्तेवर येऊन १२ महिने झाले. तुम्ही अद्याप भाजपाचा एकही आमदार फोडू शकला नाहीत. तुमच्यात जर ताकद असेल तर तुम्ही प्रयत्न करत राहा. तुम्ही दगडावर कितीही डोकं आपटलं, तरी भाजपाचा एकही आमदार फोडणं तुम्हाला जमायचं नाही”, असं थेट आव्हान भाजपा नेते सुधीर मुनगंटीवर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांना दिलं.

हातकणंगले (जि. कोल्हापूर) विधानसभा मतदारसंघातील जनसुराज्य पक्षाचे नेते, माजी आमदार राजीव आवळे यांनी बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला.त्यावेळी भाजपचे दहा आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला होता तर भाजपाचे जे आमदार राष्ट्रवादीमध्ये येतील, त्यांना पोटनिवडणुकीत जिंकवण्यासाठी तीन पक्ष मिळून एकच उमेदवार देऊ आणि भाजपाचा पराभव करू, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं.

त्यावर भाजपा नेते सुधीर मुनगंटीवर म्हणाले की , “भाजपाचे २० आमदार आमच्या पक्षात येणार असं काही लोकं सांगतात. २० तर सोडाच, पण १२ महिन्याचे १२ आमदारही तुम्हाला फोडता आले नाहीत. आम्ही लिहून देतो की आमचे जे आमदार तुमच्या पक्षात यायला तयार असतील, त्या आमदारांची आणि तुमची मिटींग आम्हीच घडवून देतो. तुम्हाला तुमच्या बळावर खूप विश्वास असला तरी आम्हाला आमच्या विचारांवर आणि निष्ठेवर पूर्ण विश्वास आहे”, असेही मुनगंटीवार म्हणाले.

ही बातमी लगेच शेअर करा ...
error: Content is protected !!