Mumbai

रिपब्लिक टीव्हीचे सीईओ विकास खानचंदानी यांना अटक

मुंबई – रिपब्लिक टीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास खानचंदानी यांना मुंबई पोलिसांनी बनावट टीआरपी प्रकरणी अटक केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत १३ जणांना अटक करण्यात आली आहे.

टीआरपी घोटाळा उघडकीस आल्यानंतर रिपब्लिक टीव्हीचे सीईओ विकास खानचंदानी यांची सुरुवातीला चौकशी करण्यात आली होती. सुरुवातीला मुंबई पोलिसांनी विकास खानचंदानी यांना चौकशीसाठी समन्स पाठवलं होतं. त्यावेळी मात्र विकास खानचंदानी चौकशीसाठी गैरहजर राहिले होते. त्यांनी कोर्टात धाव घेतली होती. मुंबई पोलिसांकडून दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करण्याची मागणी केली होती. त्याचबरोबर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी केली होती. मात्र, न्यायालयानं ही मागणी फेटाळून लावली होती.

पोलिसांनी विकास खानचंदानी यांना रविवारी (१३ डिसेंबर) त्यांच्या घरी अटक केली आहे. यामुळे रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब अर्णब गोस्वामी यांना मोठा झटका बसला आहे.

माध्यमांमध्ये टीआरपीला (TRP) अनन्यसाधारण महत्व आहे. काही माध्यमांनी एका कंपनीच्या मदतीनं TRP रेटिंग मॅन्युप्युलेट केल्याचं समोर आलं होतं. अशिक्षित लोकांच्या घरात इंग्रजी चॅनल्स चालू ठेवण्यासाठी पैसे दिले जात असल्याचीही धक्कादायक माहिती समोर आली होती. टीआरपी घोटाळा प्रकरणात रिपब्लिक टीव्ही च्या बरोबरीने ‘फक्त मराठी’ आणि ‘बॉक्स सिनेमा’ या दोन वाहिन्यांचा सहभाग असल्याचं पोलिसांनी म्हटलं होतं.

“मुंबईत जवळपास दोन हजार बॅरोमीटर बसवण्यात आले होते. टीआरपीमध्ये फेरफार करण्यासाठी त्याचा वापर करण्यात आला. या चॅनलच्यावतीने दर महिन्याला काही जण वेगवेगळया घरांमध्ये जायचे व पैसे द्यायचे. लोकांना ही चॅनल्स लावायला सांगितले जायचे,” असं पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी म्हटलं होतं.

ही बातमी लगेच शेअर करा ...

Add Comment

Click here to post a comment

Leave a Reply

error: Content is protected !!