Mumbai

मुंबई महापालिका आयुक्तांच्या विरोधात हक्कभंग

मुंबई – मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांच्याकडे महानगरपालिकेशी संबंधित विविध विकास कामांबाबत, जनकल्याणविषयक बाबतची माहिती विधिमंडळ व संसदीय कामकाजविषयक कर्तव्य पार पाडण्यासाठी उपलब्ध करुन देण्याची विनंती अनेक पत्रांच्या मार्फत करुनही एखादा अपवाद वगळता कोणत्याही पत्रांना उत्तरे देण्यात आलेली नाहीत असा गंभीर आरोप विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केला. त्यामुळे या गंभीर प्रश्नी विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी पालिका आयुक्त चहल यांच्याविरुध्द विधानपरिषदेत हक्कंभग मांडला.

विधानपरिषदेत सभापती रामराजे निंबाळकर यांनी दरेकर यांना विशेषाधिकारभंग सूचना मांडण्याची परवानगी दिला. त्यावेळी हक्कभंग सुचना मांडताना दरेकर म्हणाले की, कोरोना काळात झालेल्या गैरव्यवहारासंदर्भात शेकडो पालिका आयुक्तांना अनेक पत्र दिलीत. कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनाही दिल्या. त्यांच्याकडे काही माहितीही मागवली पण विरोधी पक्ष नेत्यांच्या पत्रांना दोन ओळींच उत्तर देण्याचे सौजन्यही आयुक्तांनी दाखवले नाही. प्रत्येकवेळी पत्रांना उत्तर देण्यासाठी टोलवाटोलवी केली. यामुळे विधिमंडळाने दिलेल्या अधिकाराला न्याय देता येत नाही. विधिमंडळाच्या मूलभूत हक्कावर यामुळे गदा आली आहे असेही दरेकर यांनी नमूद केले.

सदस्यांनी विधिमंडळ कामकाजात जास्तीत जास्त सहभाग द्यावा, जनतेचे प्रश्न मांडावेत, अंमलबजावणी यंत्रणेच्या त्रुटी सभागृहामार्फत शासनाच्या निदर्शनास आणून द्याव्यात, एकूणच शासनावर अंकुश ठेवावा, अशी अपेक्षा घटनाकारांनी संसदीय कामकाजात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या विधिमंडळाच्या सदस्यांकडून ठेवली आहे असे सांगतानाच दरेकर म्हणाले की, आपले संसदीय कर्तव्य पार पाडण्यासाठी विविध शासकीय कार्यालयाकडील अधिकृत माहिती उपलब्ध होईल व त्याचा उपयोग करुन ते वस्तुनिष्ठ प्रश्न सभागृहात मांडू शकतील, असे अभिप्रेत आहे. पण माहिती उपलब्ध न झाल्यामुळे जनतेच्या प्रश्नांबाबत सभागृहात योग्य, अधिकृत व ठोस भूमिका मांडता आली नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. त्यामुळे सदर सूचना आपण विधानपरिषद विशेषाधिकार समितीकडे कार्यवाहीसाठी पाठवावे व याप्रकरणी लवकर सभागृहासमोर अहवाल सादर करण्याची सूचना समितीला करावी, अशी विनंतीही दरेकर यांनी सभापतींकडे केली.

ही बातमी लगेच शेअर करा ...

Add Comment

Click here to post a comment

Leave a Reply

error: Content is protected !!