Mumbai

अल्पसंख्याक युवक, महिलांना मिळणार कौशल्य विकास प्रशिक्षण

मुंबई – राज्यातील अल्पसंख्याक समुदायातील युवक आणि महिलांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी त्यांना स्थानिक व्यावसायिक आणि औद्योगिक गरजांनुसार कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी २० कोटी रुपये खर्च होणार असून आवश्यक तरतूद करण्यात आली आहे. यंदा पहिल्या टप्प्यात ११ हजार ७६४ उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात येईल. यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला असल्याची माहिती कौशल्य विकास आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, पारशी, जैन आणि ज्यू समुदायातील १५ ते ४५ वयोगटातील युवक आणि महिलांना हे प्रशिक्षण देण्यात येईल. बँकींग आणि टॅक्स असिस्टंट, हेल्थ केअर, बांधकाम, लॉजिस्टीक्स, कॉम्प्युटर सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर, ॲनिमेशन आणि मल्टीमिडीया (असिस्टंट कॅमेरामन), ऑटोमोबाईल, मोटार मेकॅनिक हेवी व्हेईकल, रोड रोलर ड्रायव्हर, जेसीबी ड्रायव्हर यांसह स्थानिक व्यवसाय, स्थानिक उद्योग यांच्या गरजांनुसार हे प्रशिक्षण देण्यात येईल. हे प्रशिक्षण साधारण ३०० ते ६०० तासांचे असेल. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत स्किल इंडिया पोर्टलवर नोंदणीकृत संस्थांची निवड करुन त्यांच्यामार्फत हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. संस्थांची निवड लवकरात लवकर करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून त्यानंतर कोरोनाची परिस्थिती पाहून ही प्रशिक्षणे सुरु करण्यात येतील. अल्पसंख्याक विकास विभागामार्फत ही योजना राबविण्यात येत असल्याचे मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.

जिल्ह्यांमधील अल्पसंख्याक समुदायातील १५ ते ४५ वयोगटातील युवक आणि महिलांच्या लोकसंख्येच्या आधारे त्या त्या जिल्ह्यांमधील प्रशिक्षणांच्या बॅच आणि उमेदवारांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. प्रत्येक बॅचमध्ये साधारण ३० उमेदवार असतील. त्यानुसार मुंबई उपनगरात ५० बॅचमध्ये १ हजार ५०९ उमेदवार, ठाणे जिल्ह्यात ३५ बॅचमध्ये १ हजार ७० उमेदवार, औरंगाबाद जिल्ह्यात २१ बॅचमध्ये ६३७ उमेदवार, पुणे जिल्ह्यात २० बॅचमध्ये ६१८ उमेदवार, मुंबई शहर जिल्ह्यात १९ बॅचमध्ये ५७३ उमेदवार, नागपूर जिल्ह्यात १९ बॅचमध्ये ५६८ उमेदवार, नांदेड जिल्ह्यात १७ बॅचमध्ये ५१० उमेदवार, नाशिक जिल्ह्यात १६ बॅचमध्ये ४८२ उमेदवार, अमरावती जिल्ह्यात १५ बॅचमध्ये ४६७ उमेदवार, जळगाव जिल्ह्यात १४ बॅचमध्ये ४२८ उमेदवार, बुलढाणा जिल्ह्यात १४ बॅचमध्ये ४१४ उमेदवार, अकोला जिल्ह्यात १३ बॅचमध्ये प्रत्येकी ४०७ उमेदवार, परभणी जिल्ह्यात १० बॅचमध्ये २९८ उमेदवार, यवतमाळ जिल्ह्यात ९ बॅचमध्ये २८० उमेदवार, सोलापूर जिल्ह्यात ९ बॅचमध्ये २७८ उमेदवार, लातूर जिल्ह्यात ९ बॅचमध्ये २६० उमेदवार, जालना जिल्ह्यात ८ बॅचमध्ये २५१ उमेदवार, कोल्हापूर जिल्ह्यात ७ बॅचमध्ये २३१ उमेदवार, बीड जिल्ह्यात ७ बॅचमध्ये २२६ उमेदवार, अहमदनगर जिल्ह्यात ७ बॅचमध्ये २१७ उमेदवार, चंद्रपूर जिल्ह्यात ७ बॅचमध्ये २११ उमेदवार, रायगड जिल्ह्यात ६ बॅचमध्ये १९४ उमेदवार, वाशिम जिल्ह्यात ६ बॅचमध्ये १८७ उमेदवार, हिंगोली जिल्ह्यात ६ बॅचमध्ये १८२ उमेदवार, सांगली जिल्ह्यात ६ बॅचमध्ये १७९ उमेदवार, रत्नागिरी जिल्ह्यात ५ बॅचमध्ये १५२ उमेदवार, सातारा जिल्ह्यात ५ बॅचमध्ये १४९ उमेदवार, धुळे जिल्ह्यात ४ बॅचमध्ये १२३ उमेदवार, उस्मानाबाद जिल्ह्यात ४ बॅचमध्ये १२० उमेदवार, वर्धा जिल्ह्यात ४ बॅचमध्ये ११६ उमेदवार, भंडारा जिल्ह्यात ३ बॅचमध्ये ८९ उमेदवार, नंदुरबार जिल्ह्यात ३ बॅचमध्ये ८३ उमेदवार, गोंदीया जिल्ह्यात ३ बॅचमध्ये ७९ उमेदवार, गडचिरोली जिल्ह्यात २ बॅचमध्ये ७५ उमेदवार, पालघर जिल्ह्यात २ बॅचमध्ये ६९ उमेदवार तर सिंधुदूर्ग जिल्ह्यात १ बॅचमध्ये ३३ उमेदवार याप्रमाणे एकूण ११ हजार ७६४ उमेदवारांना प्रशिक्षण दिले जाईल. प्रत्येक उमेदवाराला दर्जेदार प्रशिक्षण मिळावे यासाठी प्रत्येकी सुमारे १७ हजार रुपये खर्च होणार आहे, असेही मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.

प्रशिक्षण संपल्यानंतर उमेदवारांना रोजगार किंवा स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी संबंधित प्रशिक्षण संस्थेमार्फत कार्यवाही करण्यात येईल. तसेच उमेदवारांना सेक्टर स्किल कौन्सिल यांच्यामार्फत प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

ही बातमी लगेच शेअर करा ...

Add Comment

Click here to post a comment

Leave a Reply

error: Content is protected !!