Main News

धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द होणार ? कायदेपंडित म्हणतात…

मुंबई – राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू अशोक शर्मा हिने बलात्काराचा आरोप केल्यानंतर मुंडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की , करूणा शर्मा नावाच्या एका महिलेसोबत मी 2003 पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो.सदर परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले झाली. सदर दोन्ही मुलांना मी माझे नाव दिले आहे. शाळेच्या दाखल्यापासून ते सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझेच नाव आहे, ही मुले माझ्यासोबतच राहतात. माझे कुटुंबीय, पत्नी आणि माझी मुले यांनी देखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतले असून स्वीकृती दिलेली आहे.

मात्र मुंडे यांनी ऑक्टोबर 2019 विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्याला विवाहबाह्य संबंधातून दोन अपत्य असल्याची माहिती दिली नसल्याने ते अडचणीत येण्याची शक्यता आहे.धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द होणार का ? याबाबत उलट – सुलट चर्चा सुरु आहे.

इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आलेल्या धनंजय मुंडे यांच्या प्रतिज्ञापत्रात पत्नी आणि तीन मुलींचा उल्लेख करण्यात आला आहे. आपल्यावर अवलंबून असलेल्या व्यक्ती या रकान्यात तीन मुलींची नावे दिली आहेत.

धनंजय मुंडे यांनी विवाहबाह्य संबंधातून आपल्याला दोन मुलं असल्याचं म्हटलं आहे. पण प्रतिज्ञापत्रात यासंदर्भात माहिती दिसून येत नाही. त्यामुळे धनंजय मुंडे याप्रकरणी अडचणी येण्याची शक्यता असल्याचं कायदेतज्ज्ञांचं म्हणणं आहे.

या संदर्भात निवडणूक आयोगाचे काय नियम आहेत? अपत्य असल्याचा आणि त्यांची नावं प्रतिज्ञापत्रात न दिल्यास उमेदवारावर निवडणूक आयोग कारवाई करू शकतं का? या प्रकरणात धनंजय मुंडे यांची आमदारकी आणि मंत्रिपद रद्द होऊ शकतं का? असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

यासंदर्भात बोलताना पुण्यातील प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी सांगितलं, “सर्वोच्च न्यायालयाच्या निकालनुसार, स्त्री-पुरूष संबंधातून जन्माला आलेलं कोणतंही मुल बेकायदेशीर ठरू शकत नाही. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी आपल्या अपत्यांची माहिती प्रतिज्ञापत्रात देणं गरजेचे होतं.”

“इंडियन ओथ ॲक्ट आणि प्रतिज्ञापत्राच्या कायद्यानुसार दिशाभूल करणारं प्रतिज्ञापत्र गुन्हा ठरू शकतं. यासंदर्भात तक्रार झाल्यास आणि जनतेची आणि निवडणूक आयोगाची दिशाभूल केल्याचं सिद्ध झाल्यास धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई होऊ शकते.”

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे स्वतःच नात्याची कबुली दिल्यामुळे आणि त्यापासून दोन अपत्ये असल्याची माहिती दिल्यामुळे त्यांची प्रतिमा मलीन झाली आहे. परळीची जनता त्याकडे कोणत्या दृष्टीने पाहते, हे देखील महत्वाचे आहे.

ही बातमी लगेच शेअर करा ...
error: Content is protected !!