Main News

धनंजय मुंडे यांच्यावर संक्रांत ! मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता !!

मुंबई – मुंबईत राष्ट्रवादीमध्ये सध्या मोठ्या घडामोडी सुरु आहेत. सकाळपासून बैठकीचे सत्र सुरु असताना, पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सूचक वक्तव्यानंतर धनंजय मुंडे हे मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता राजकीय गोटात व्यक्त केली जात आहे.

धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपाचं स्वरुप गंभीर आहे. यासंबंधी पक्ष म्हणून विचारविनिमय करावा लागेल, असे सूचक वक्तव्य शरद पवार यांनी माध्यमाशी बोलताना केले आहे. पवार यांचे वक्तव्य पाहता, धनंजय मुंडे यांच्यावर संक्रांत दिसत आहे. सायंकाळपर्यंत ते आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देतील, अशी शक्यता आहे.

धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांबाबत खुद्द त्यांच्या पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनीही हे प्रकरण गंभीर असल्याचं म्हटलंय तर मंत्री मुंडे यांनी तात्काळ राजीनामा देणं अपेक्षित आहे, असं मत विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी व्यक्त केलं आहे.

दरम्यान, पक्ष जो निर्णय घेईल, तो मानणार असल्याचे सूतोवाच धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. मुंडे यांनी सांगितलं की, “मी स्वत: शरद पवारांकडे स्पष्टीकरण दिलं आहे. बुधवारी सकाळीच मी त्यांची वेळ घेतली आणि भेटून सविस्तर माहिती दिलेली आहे. आणि माझं व्यक्तीगत जे म्हणणं आहे ते मी प्रेसनोटच्या माध्यमातून प्रसारमाध्यांना दिलं आहे”. धनंजय मुंडे यांना राजीनाम्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “याबाबत शरद पवार आणि पक्षातील मोठे नेते विचार करतील आणि त्याबाबत निर्णय होईल”.

 

ही बातमी लगेच शेअर करा ...
error: Content is protected !!