Main News

धनंजय मुंडे यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल

मुंबई – राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात रेणू शर्मा हिने मुंबई पोलिसांकडे बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर मुंडे यांनी दुसरे लग्न केल्याचे सार्वजनिकरित्या मान्य केले आहे. दुसऱ्या पत्नीची आणि त्यांच्या मुलांची काळजी घेत असल्याचेही त्यांनी कबुल केले आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या शपथपत्रात आपल्या दुसऱ्या विवाहाची पत्नी, मुलांची व त्यांच्या नावे असलेल्या संपत्तीची माहिती लपविल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यामुळे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे.

दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक झाली आहे. महाराष्ट्र्र भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मुंडेंवर झालेल्या बलात्काराच्या आरोपानंतर मुख्यमंत्री आता धनंजय मुंडेंवर अॅक्शन घेणार का? हा सवाल उपस्थित होत आहे. थेट महिलेने केलेले गंभीर आरोप, पोलिसांमध्ये दिलेली तक्रार असा नैतिक आणि कायदेशीरदृष्ट्या मुख्यमंत्र्यांवर दबाव असू शकतो. त्यामुळे मुख्यमंत्री नेमका कोणता पवित्रा घेतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.

मुंडे यांच्या दुसऱ्या पत्नीच्या नावावर आहे इतकी संपत्ती …

दरम्यान दुसऱ्या पत्नी सौ. करुणा धनंजय मुंडे (डीन क्र. 06774438) आणि त्यांचा भाऊ ब्रिजेश कुमार शर्मा यांची भागीदारीत एक कंपनी KDM TREXIM PRIVATE LIMITED असून त्याचा नोंदणी क्र. 32349 दि. 07 फेब्रुवारी 2014 असून सीआयएन क्र. CIN U74900MP2014PTC032349 असा आहे. या कंपनीने फँटम फिल्मसच्या मालकीची 3 कोटी कर्जरुपी गुंतवणूक केल्याची माहिती उजेडात आलेली आहे. सदर माहिती निवडणूक शपथपत्रात दुसरी पत्नी करुणा मुंडे आणि मुलाचे नाव जाहीर केले नाहीत तसेच त्यांनी केडीएम ट्रेक्सिम प्रायव्हेट लिमिटेडचा खुलासा केलेला नाही जेथे त्यांची दुसरी पत्नी कंपनीत संचालक आहेत.

निवडणूक आयोगाला दाखल शपथपत्रात कौटुंबिक सदस्यांची माहिती व त्यांच्या संपत्तीची माहिती लपविल्याचे उघड झाल्याने त्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित असल्याचे विरोधीपक्ष नेत्यांचे म्हणणे असून त्यांनी याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली आहे. निवडणूक आयोग काय व किती तत्परतेने कारवाई करेल हे येणारया काळातच सामान्य नागरिकांना समजून येईल. किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाकडे याबाबतची थेट लेखी तक्रार केली आहे.

निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात पाच अतिशय महत्वाचे मुद्दे नमूद करत धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले आहेत. त्यामुळे सोमय्या यांच्या तक्रारीवर निवडणूक आयोग काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांच्यासाठी मुंबईत फ्लॅट घेऊन दिल्याचेही मान्य केले आहे. शिवाय यांच्या मुलांना आपले नाव दिल्याचीही कबुली त्यांनी दिली आहे. पण ऑक्टोबर २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी धनंयज मुंडे यांनी आपल्या शपथपत्रात दुसऱ्या विवाहाची माहिती लपवली होती. त्यामुळे या प्रकरणाची दखल घेऊन आपण योग्य ती कारवाई करावी, असं किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. दरम्यान बलात्कार प्रकरणाच्या आरोपामुळे अडचणीत सापडलेले सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आज मंत्रालयात आले होते. यावेळी त्यांनी उपमुख्ममंत्री अजित पवार आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. त्यामुळे या भेटीबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

कायदा काय सांगतो ?


2001 च्या अपत्याच्या कायद्यानुसार दोन अपत्यांमध्ये तिसऱ्या मुलाची भर पडल्यास तो कायद्याने गुन्हा आहे अशी व्यक्ती निवडणूक लढवण्यास अपात्र ठरते हा नियम फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांना लागू आहे. विधानसभा सदस्यांना नियम लागू नसल्याने मुंडे यांची आमदारकी धोक्यात येऊ शकत नाही. केवळ दुसऱ्या पत्नीची व मुलांची माहिती व त्यांच्या संपत्तीची माहिती लपविल्याचे स्पष्ट होत आहे. खोटे, अपूर्ण शपथपत्र दाखल केल्याने त्यांच्यावर कारवाई होऊ शकते.

हिंदू या व्याख्येत बसणाऱ्या पुरुषाला दोन किंवा त्यापेक्षा जास्त लग्न करता करता येत नाही. द्विभार्या प्रतिबंधक कायदा 1946 नुसार एक लग्न झालेले असतांना दुसरे लग्न करणे बेकायदेशीर ठरते. धनंजय मुंडे यांचे कायदेशीर लग्न झाले आणि त्यांची कायदेशीर पत्नी आहे. त्यांनी दुसरे लग्न केले नाही. ते 2006 पासून एका स्त्री सोबत विवाहासारख्या संबंधात राहतात पण ती त्यांची कायदेशीर बायको नाही. त्यामुळे द्विभार्या प्रतिबंधक कायदा लागूच होत नाही आणि एक बायको असतांना दुसऱ्या स्त्रीशी विवाहा-सारखे संबंध ठेवणे याविरोधात एक तर कायदेशीर पत्नी तक्रार करू शकते किंवा विवाहाशिवाय सहजीवनासरखे संबंध असलेली स्त्री तक्रार करू शकते.

धनंजय मुंडेंच्या बाबतीत या दोन्ही स्त्रियांची काहीही तक्रार नाही. तसेच निवडणुकीच्या आधी उमेदवाराने जी माहिती माहिती द्यायची असते त्यामध्ये कायदेशीर बायकोची माहिती देणेच आवश्यक आहे. त्याअर्थाने धनंजय मुंडे यांनी बायको बद्दलची माहिती लपविली असेही एका अर्थाने म्हणता येत नाही. पण मुलांची माहिती त्यांनी लपविली आहे. असे खोटे व दिशाभूल करणारे प्रतीज्ञापत्र निवडणूक आयोगासमोर दाखल करणे ही गंभीर कायदेशीर चूक आहे. पूर्वी विवाहाशिवायच्या संबंधातून झालेल्या मुलांना ‘अनौरस’, नाजायज असे म्हणायचे पण तसे म्हणणे चुकीचे आहे असे स्पष्ट करतांना सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, स्त्री-पुरुषांचे संबंध कायदेशीर किंवा बेकायदेशीर असू शकतात पण कोणतेच मूल बेकायदेशीर नसते. धनंजय मुंडे यांनी मुलांची जबाबदारी घेतली आहे. त्यांनी मुलांना स्वतःचे नाव वडील म्हणून दिले आहे. त्यामुळे त्यांनी प्रतीज्ञापत्रात त्या मुलांचा उल्लेख करणे आवश्यक होते.

 

 

ही बातमी लगेच शेअर करा ...
error: Content is protected !!