Latest News

महाराष्ट्रात असे होईल लसीकरण …

मुंबई – महाराष्ट्रात कोरोना लस पोहोचली असून लसीकरणाचा कार्यक्रम सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आरोग्य प्रशासन सज्ज असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री ना राजेश टोपे यांनी माध्यमांना दिली.

महाराष्ट्राला ९ लाख ८३ हजार लसी मिळाल्या आहे. कोरोना लस देण्यासाठी सध्या ७ लाख ८० हजार कोविड योद्ध्यांची निवड करण्यात आली आहे. प्रत्येकाला दोन डोस याप्रमाणे अंदाजे १६ लाख लसी द्याव्या लागतील. यातील १० टक्के लसी उपयोगात येऊ शकणार नाहीत, अशी शक्यता गृहीत धरल्यास अंदाजे १७ लाख ५० हजार लसींची आवश्यकता लागणार आहे.

सध्या राज्याला सीरम इन्स्टिट्यूटकडून ९ लाख ६३ हजार लसी मिळाल्या आहेत. तर भारत बायोटेककडून २० हजार लसींचे डोस मिळाले आहेत. प्रत्येक व्यक्तीला एक एक डोस देण्यापेक्षा दोन डोस पूर्ण देण्याचे निर्देश केंद्र सरकारने सर्व राज्यांना दिले असल्याचे ना. राजेश टोपे यांनी सांगितले.

असे होईल लसीकरण

आरोग्य विभागाचे राज्यभरात ८ उपसंचालक विभाग आहेत. त्याठिकाणी कोरोना लसीची साठवणूक करण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर, नागपूर आणि अकोला याठिकाणी आज दिवसभरात लसी पोहोचतील. त्यानंतर जिल्हा स्तरावरील अधिकारी उपसंचालक विभागात जाऊन आपापल्या वाट्याच्या लसी जिल्ह्यात घेऊन जातील आणि वॅक्सिन कोल्ड चेनमध्ये त्या ठेवल्या जातील. वॅक्सिन कोल्ड चेनमध्ये आयएलआर (आईस लाईन रेफ्रिजरेटर) आणि डीप फ्रिजरची सुविधा देण्यात आली आहे. डीप फ्रिजरमध्ये बर्फ तयार केला जातो आणि आयएलआरमध्ये टाकला जातो. २ ते ८ डिग्रीमध्ये वॅक्सिन ठेवावे लागेल, अन्यथा त्याचा परिणाम राहणार नाही, अशी सविस्तर माहिती आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

राज्यभरात ३५० सेंटर्सवर लसीकरण राबविले जाईल. केंद्र सरकारने दिलेल्या सूचनेनुसार दररोज २० ते २५ हजार लसी दिल्या जातील. एका महिन्यात ९ लाख लोकांना लसी देण्याचे नियोजन आहे. १६ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी लसीकरणाचे ऑनलाईन उदघाटन करणार आहेत. कुपर हॉस्पिटल आणि जालना येथील जिल्हा रुग्णालयातून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात येईल, असेही ना. राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

ही बातमी लगेच शेअर करा ...

Add Comment

Click here to post a comment

Leave a Reply

error: Content is protected !!