Latest News

शक्ती कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची हमी द्याव – उमा खापरे

मुंबई – बालिका, महिला, तरूणींवरील अत्याचार रोखण्यासाठी राज्यात दिशा सारखा प्रभावी कायदा लागू करावा, ही भाजपा महिला मोर्चाची अनेक दिवसांपासूनची मागणी राज्यातील आघाडी सरकारने उशीरा का होईना मान्य केली आहे. आता या कायद्याच्या कठोर अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत, अशी मागणी भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष श्रीमती उमाताई खापरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

श्रीमती खापरे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, गेल्या वर्षभरात राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांत मोठी वाढ झाली. बालिकांवरही अमानवी अत्याचार झाले. या घटनांना आळा घालण्यासाठी राज्यात आंध्र प्रदेशच्या धर्तीवर दिशा कायदा लागू करावा, अशी मागणी भाजपा महिला मोर्चाने विविध माध्यमांद्वारे सातत्याने केली आहे. महिलांवरील अत्याचाराकडे राज्य शासनाचे लक्ष वेधावे यासाठी महिला मोर्चातर्फे राज्यभर आक्रोश आंदोलन केले गेले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांवरील अत्याचाराच्या घटनांची यादी मुख्यमंत्र्यांना सादर केली होती. राज्यात लॉकडाऊनच्या काळात विलगीकरण केंद्रात महिलांवर अत्याचाराच्या, विनयभंगाच्या घटना घडल्या. अशा प्रकारांना पायबंद घालण्यासाठी महिला मोर्चाने विलगीकरण केंद्रांसाठी एसओपी लागू करा अशी मागणी केली होती.

राज्यभर आंदोलन करूनही महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी प्रभावी कायदा लागू केला जात नव्हता. अलीकडेच राज्य सरकारने शक्ती कायदा प्रस्तावित केला आहे. या कायद्यास विलंब झाला असला तरी महिला मोर्चा या कायद्याचे स्वागत करीत आहे. राजकीय दबावामुळे अशा घटनांतील कोणाही आरोपीची सुटका होऊ नये यासाठी राज्य सरकारने कोणाला दयामाया न दाखविता या कायद्याची कठोर अंमलबजावणी केली पाहिजे, असेही, श्रीमती खापरे यांनी नमूद केले आहे.

ही बातमी लगेच शेअर करा ...

Add Comment

Click here to post a comment

Leave a Reply

error: Content is protected !!