Kokan

खावटी योजनेच्या वस्तू खरेदीची निविदा प्रक्रिया अखेर रद्द

उसगांव – खावटी योजनेच्या वस्तू खरेदीची निविदा प्रक्रिया रद्द करून संपूर्ण ४००० रू. रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा (DBT) करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतल्याने श्रमजीवी संघटनेच्या मागणीला मोठे यश मिळाले आहे. श्रमजीवी संघटनेचे संस्थापक तथा राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समिती अध्यक्ष विवेक पंडित यांनी वस्तू खरेदीची निविदा प्रक्रिया रद्द करून संपूर्ण ४००० रु. रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा (DBT) करण्याची मागणी केली होती. तसेच याबाबत सतत पाठपुरावा करून मान. राज्यपाल, मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, आदिवासी विकास मंत्री यांना वेळोवेळी पत्रव्यवहार केला होता. तसेच श्रमजीवींच्या या मागणीला ठाणे, पालघर, नाशिक आणि रायगड मधील आमदारांनी पाठिंबा देत तसे पाठिंब्याचे पत्र देखील मुख्यमंत्र्याना दिले होते.

कोरोना महामारीच्या काळात आदिवासी बांधवांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने खावटी योजनेतून लाभार्थी कुटुंबाला २००० रूपये रोखीने त्यांचा बँक खात्यात व २००० रुपयांची मदत अन्नधान्याच्या स्वरूपात देण्याचे जाहीर केले आहे. परंतु आदिवासी विकास महामंडळाकडून खरेदी प्रक्रियेत नेहमीच भ्रष्टाचार होत असल्याचे वेळोवेळी उघड झाले आहे असे म्हणत या खावटी योजनेच्या वस्तू खरेदीमध्ये ५० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार होणार असल्याची भीती विवेक पंडित यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे वस्तू खरेदीची निविदा प्रक्रिया रद्द करून थेट DBT ने लाभार्थ्यांच्या खात्यात सर्व ४००० रक्कम लाभार्त्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी विवेक पंडित यांनी केली होती.

या योजनेच्या अंमलबावणीतील दिरंगाई व अनियमिततेमुळे तसेच लाभार्थ्यांचे स्थलांतर झाल्यामुळे त्यांच्यापर्यंत जीवनावश्यक वस्तू पोहोचू शकणार नाहीत. याबाबत विवेक पंडित यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उप मुख्यमंत्री अजित पवार, आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांना या निविदा प्रक्रिया आणि खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होण्याची शक्यता होती. त्यामुळे सदर खावटी योजनेची वस्तू खरेदी तात्काळ थांबवणेबाबत पंडित यांनी दिनांक ९ नोव्हेंबर २०२० रोजी, २५ नोव्हेंबर २०२० रोजी तसेच नंतर ३ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सविस्तर पत्र लिहिली होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यानी घेतलेल्या खावटी योजनेच्या वस्तू खरेदीची निविदा प्रक्रिया रद्द करण्याच्या निर्णयाचे स्वागत करून “आता खावटी योजनेचा पूर्ण लाभ प्रत्येक आदिवासी लाभार्थ्यांच्या खात्यात जाणार असून कोणत्याही भ्रष्टाचाराला संधी उरली नसल्याचे मत विवेक पंडित यांनी व्यक्त केले आहे. या निर्णयामुळे विवेक पंडित यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उप मुख्यमंत्री अजित पवार तसेच, निविदा रद्द करण्याच्या मागणीला पाठिंबा दिलेल्या आमदारांचे देखील आभार मानले आहेत.

विवेक पंडित यांनी पाठिंबा दिलेल्या आमदारांचे मानले आभार श्रमजीवी संघटनेच्या मागणीला पाठिंबा दिलेल्या आमदारांमध्ये भिवंडी ग्रामीणचे शिवसेना आमदार शांताराम मोरे, भिवंडी (प) चे भा.ज.पा.आमदार महेश चौगुले, शहापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे दौलत दरोडा, ठाणे मतदार संघाचे भा.ज.पा. आमदार संजय केळकर, कल्याण (प) चे शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर, कल्याण (ग्रा)चे मनसे आमदार राजू पाटील, वसईचे बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर, नालासोपाराचे आमदार क्षितिज ठाकूर, बोईसरचे आमदार राजेश पाटील, पनवेलचे भा.ज.पा. आमदार प्रशांत ठाकूर, इगतपुरीचे काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांचा सहभाग आहे. या सर्व आमदारांनी खावटी योजनेच्या वस्तू खरेदीची निविदा प्रक्रिया रद्द करून संपूर्ण ४००० रू. रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा (DBT) करण्याबाबत श्रमजीवी संघटनेच्या मागणीला पाठिंबा देऊन तसे पत्र देखील मान. मुखमंत्री उद्धवठाकरे यांना दिले आहे. या सर्व आमदारांचे विवेक पंडित यांनी आभार मानले आहेत.

ही बातमी लगेच शेअर करा ...

Add Comment

Click here to post a comment

Leave a Reply

error: Content is protected !!